ठाणे : प्रतिनिधी
प्रदीप पुर्णेकर समर्थकांनी घोडबंदर रोड येथील मानपाडा भागात रास्ता रोको केला. यावेळी टायर जाळून त्यांनी ठाणे पोलिसांचा निषेध व्यक्त केला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी दिवसभर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला होता. मात्र, रात्री उशिरा वातावरण तणावपूर्ण झाले होते. पुर्णेकर समर्थकांनी मानपाडा येथे मुख्य महामार्ग दोन्ही बाजूनं रोखून धरला होता.
तसेच हजारो नागरिक एकाचवेळी रस्त्यावर आल्याने प्रचंड तणाव या भागात निर्माण झाला. या गोंधळामुळे घोडबंदर रस्त्याच्या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात हातात फलक घेऊन कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दुपारी नौपाडा तर रात्री मानपाडाचा मुख्य रस्ता बंद केल्याने ठाणे पोलिसांची दमछाक झाली. यावेळी मोठा प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या रास्ता रोकोमुळे घोडबंदरहून ठाण्याकडे येणा-या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मीनाक्षी शिंदे यांची सात तास चौकशी- शिवसेनेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची साडेसात तास एसटी पथकाकडून चौकशी करण्यात आली. त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची या प्रकरणात आधीच एसआयटीकडून तब्बल ७ वेळा चौकशी करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, जेव्हा-जेव्हा पोलीस चौकशीसाठी बोलवतील तेव्हा मी येईल, असे यावेळी मिनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. राजेंद्र शिंदे हे आरोपींना हत्येच्या एक तास आधी भेटले यावर मीनाक्षी शिंदे यांना विचारले. त्यावर त्यांनी मला माहित नाही. पोलिस तपास करतील असे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची हत्या होण्यापूर्वी एक तास आधी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदेंसह आरोपी एकत्र चहा पित होते, असा खळबळजनक आरोप पुर्णेकर यांचे पुत्र राम पुर्णेकर यांनी केला. एवढेच नव्हे तर चहा पित असतानाचा व्हिडीओ देखील त्यांनी दाखवला. आतापर्यंत आम्ही मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्याविरोधात अनेक पुरावे दिले. आता हद्द झाली आहे, आणखी किती पुरावे द्यायचे? असा सवाल पुर्णेकर कुटुंबानं केला आहे.
शिंदे कुटुंबाने कट रचल्याचा आरोप
प्रदीप पुर्णेकर यांची त्यांच्या कार्यालयातच गोळ्या झाडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सुभाष उर्फ पप्या शिंदे, निखील यादव, नितेश पवार, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, अमित सिंह उर्फ पपलू अशा पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून हत्येत वापरलेली शस्त्रे देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. या हत्येचा कट मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनीच रचल्याचा आरोप पुर्णेकर कुटुंब वारंवार करीत आहे.
















