ठाणे : प्रतिनिधी
ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तसेच, कोयत्याने वार करत निर्घुण हत्या केली. पूर्णेकर कुटुंबीयांनी या प्रकरणात माजी महापौर आणि शिवसेनेच्या महिला नेत्या मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे मुख्य सूत्रधार असल्याचे गंभीर आरोप केले.
या घटनेला गुरुवारी ( २९ ऑक्टोबर) तब्बल १ महिना झाला. यावरून सध्या ठाण्यात मोठा वाद सुरु आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेना हे दोघेही एकमेकांसमोर आले आहेत. अशामध्ये गुरुवारी मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द केला आहे.
‘गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप व सर्वपक्षीय एकत्रित येऊन माझ्यावर विविध आरोप करत पक्ष नेतृत्वास अर्थात मुख्य नेते व पालकमंत्री म्हणून आपणास वेठीस धरण्याचे जे षडयंत्र चालू आहे हे पाहून माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत. मी आजवर संपूर्ण निष्ठेने पक्षाचे काम केले. पक्षाला किंवा आपणांस कधीही मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केले नाही. तरीही, ज्या प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जोडून आपल्यावर आणि पक्षावर दबाव निर्माण केला जात आहे, हे पाहून मन व्यथित होते.’ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझी निष्ठा आणि माझ्या कार्याची पावती आरोपांच्या माध्यमातून दिली जात असल्याची भावना मनाला बोचत आहे. म्हणूनच, मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री शिंदेंकडे सुपूर्द करीत आहे. हा निर्णय नाराजीतून नव्हे, तर आपल्या नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला आहे. असे म्हणत मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिला आहे.
२९ सप्टेंबरला ठाण्याच्या मानपाडा भागातील कार्यालयात प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली आहे. यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात सुभाष शिंदे उर्फ पप्या, निखिल यादव उर्फ शूटर, नितेश पवार, संतोष कनोजिया आणि अमित सिंह या पाच जणांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पण, पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर राहिलेल्या शिवसेनेच्या नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे हे या हत्येमागे प्रमुख सूत्रधार असल्याचे गंभीर आरोप केले. यानंतर या हत्या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या.
















