मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.
प्रज्ञा सातव या गत काही महिन्यांपासून सातत्याने काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, त्यांनी आज सकाळीच त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. प्रज्ञा सातव यांचे पती राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी जबर झटका असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रदेश कार्यालयात जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे त्यांचे समर्थकही उपस्थित होते. हे सर्वजण काल सायंकाळीच मुंबईत पोहोचले होते. यावेळी बोलताना प्रज्ञा सातव यांनी भाजपश्रेष्ठींना यापुढे आपण सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास व सबका विश्वास या धोरणानुसार वाटचाल करण्याची ग्वाही दिली.
प्रज्ञा सातव यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत केली. मागच्या ३० वर्षांपासून त्यांनी राजीव सातव यांच्या खांद्याला खांदा लावून हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी, शेतमजूरांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. त्यांनी विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असे ते म्हणाले. प्रज्ञा सातव यांनी का घेतला टोकाचा निर्णय? राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता.
विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांचे नाव चर्चेत असताना हिंगोलीच्या तत्कालीन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी त्यांना डावलून इतर नावांना पसंती दिली होती. त्यावरून डॉ. सातव व वर्षा गायकवाड यांच्यात कथित वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. यामुळे पक्षाच्या बैठकांत गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसच्या नेत्यांकडूनच पक्षात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने अखेर डॉ. सातव यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असा दावा केला जात आहे.
विकसित हिंगोलीसाठी सातव भाजपमध्ये : बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी विकसित हिंगोलीसाठी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले. हिंगोली हा विकासापासून कमजोर झालेला जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी राजीव सातव यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी जिल्ह्यातील बारा बलुतेदार व कष्टक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड मेहनत व प्रचंड कष्ट घेतले. एखादा सज्जन व्यक्ती कसा असावा हे आपल्याला सातव यांच्या रुपाने पाहावसाय मिळाले.
हिंगोलीच्या राजकारणावर फरक पडणार?
डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यातील राजकारणावर मोठा असा परिणाम होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र कळमनुरी तालुक्यात भाजपाला काही प्रमाणात बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातव यांच्या भाजप प्रवेशाशी माझा संबंध नाही : अशोक चव्हाण
खासदार अशोक चव्हाण यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, सध्या अनेकांना काँग्रेसमध्ये आपले भवितव्य सुरक्षित नसल्याचे वाटत आहे. महाराष्ट्र काँग्रेस आता नेतृत्वहीन झाली आहे. लोकांना आपल्या भविष्याची व पक्षाच्या भविष्याची अजिबात शाश्वती वाटत नाही. त्यामुळे हे आता होत असावे. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशाशी माझा कोणताही संबंध नाही. माझा व त्यांचा अनेक दिवसांपासून संवादही नाही. प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगवेगळी असते. निवडणुकीचे राजकारण वेगळे आहे, नॉमिनेशनचा विषय वेगळा आहे. निवडणुकीचा विषय येतो तेव्हा मेरिट पहावी लागते. कोण लोकप्रिय आहे, याचीही जाण असली पाहिजे. अन्यथा काम करणारे बाजूला राहतात आणि काम न करणारेच पुढे येतात. त्यामुळे वाद होतात. नेतृत्वाने याकडे लक्ष दिले असते तर काँग्रेसमध्ये सध्या जे घडत आहे ते घडले नसते असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
गत ४ महिन्यांत हिंगोलीत मोठी उलथापालथ
उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील ४ महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

