अमरावती : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये ‘मनोमिलन’ घडून आले आहे. पोटे यांनी थेट रवी राणा यांची भेट घेत वाद संपविल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे.
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात विजयासाठी २२७ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे कागदावर हक्काची २५० मते असली, तरी त्यात भाजपची १५२ मते आहेत. उर्वरित मतांमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे २६ नगरसेवक आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांचा मोठा गट आहे. ही मते पोटे यांच्या विजयासाठी अत्यंत निर्णायक मानली जात होती. राणा दाम्पत्याची सुरुवातीची साशंक भूमिका पोटे यांच्या गोटात चिंता वाढवणारी ठरत होती. कोणतीही राजकीय जोखीम पत्करायची नसल्याने पोटे यांनी थेट राणांचे दार गाठले. आता युवा स्वाभिमानची ही २६ मते पोटे यांच्या पारड्यात अधिकृतपणे पडणार असल्याने महायुती ‘सेफ झोन’मध्ये पोहोचल्याचे चित्र आहे.
मविआच्या गोटात नैराश्य
महायुतीने आपली अंतर्गत डॅमेज कंट्रोलची फळी मजबूत केली असताना, महाविकास आघाडी आणि विशेषत: काँग्रेसमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि उदासीनतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजित देशमुख हे गेल्या पाच दिवसांपासून अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले, ते थेट नागपूरच्या एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवाराच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या प्रचाराचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी स्वपक्षाच्या उमेदवारावर १५ ते २० कोटी रुपयांचा ‘घोडेबाजार’ करून निवडणूक मॅनेज केल्याचा आरोप केल्याने मविआच्या गोटात पुरते नैराश्य पसरले आहे.
















