नाशिक : प्रतिनिधी
नवरात्रोत्सव अवघ्या आठवड्यावर आला असताना भगर प्रथमच २२० रुपयांवर पोहोचली असून गत वर्षापेक्षा ८० ते १०० रुपयांनी दर जास्त आहे. तर शेंगदाणा तेलाच्या दरातही ४० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्याचा फटका उपवासाच्या पदार्थांना बसला असल्याची माहिती बाजारातील तज्ज्ञांनी दिली.
उपवासासाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ आणि फळांचा आहार केला जातो. मागणी वाढल्यामुळे व्यापा-यांनी दरवाढ केली आहे. रेडिमेड फराळाच्या पदार्थांवर १५ ते २० टक्क्यांपर्यंत भाववाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात अनेक भाविक नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे फराळाच्या पदार्थांना मागणी ३० ते ४० टक्के वाढते.
मागील दोन महिन्यांपूर्वी १२० रुपये किलो असलेली तूरडाळ आता १६० रुपयांवर गेली आहे. हरभरा डाळही ८० रुपयांवरून १०० रुपये किलो झाली आहे. हरभ-याच्या दरातही किलोमागे १० रुपयांची वाढ होऊन तो ८० रुपयांवर पोहोचला आहे. मसूर, मटकी, वाटाणा, मूग या कडधान्यांच्या दरातही किलोमागे तीन ते चार रुपयांची वाढ झाली आहे.
तूरडाळ ४०, हरभरा डाळ २० रुपयांनी महाग
महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आता ऐन सणासुदीत उपवासाच्या पदार्थांसोबतच सर्वच डाळी, तांदूळ आणि गव्हाच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. पूर्वी ४८ ते ६० रुपये किलो असलेला तांदूळ आता ५५ ते ६५ रुपये किलोवर पोहोचला आहे. तूरडाळीच्या ठोक दरातही वाढ झाली आहे.
















