नाशिक : नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने प्रशासनात खळबळ माजली आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या ५८ वर्षीय शिवदास भालेराव या बंदीवानाने स्वत:चा जीव घेतला.
शिवदास भालेराव हा सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून त्याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि जून २०२४ पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. अचानक कारागृहातील एका कोप-यात त्याने गळफास घेतल्याचे अधिर्कायांच्या निदर्शनास आले. कारागृहातील पोलिस अंमलदारांनी तात्काळ त्याला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर कारागृहात एकच खळबळ उडाली असून सहकारी कैद्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
भालेरावने आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीप्रमाणे, तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची शक्यता तपासली जात आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून कारागृह प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्तरीत्या तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक तपासणी, कैद्यांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज यावरून नेमकी आत्महत्येपूर्व परिस्थिती उघड होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, एका सरकारी संरक्षित ठिकाणी असा प्रकार घडल्याने कारागृहातील देखरेख आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
व्हीडीओनंतरही प्रशासन सावध नाही
या आत्महत्येच्या घटनेच्या काही दिवस आधीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह एका अन्य गंभीर प्रकारामुळे चर्चेत आले होते. काही कैद्यांचे अंमली पदार्थ सेवन करतानाचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हीडीओमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करून कैदी अमली पदार्थ ओढताना दिसत होते, तसेच काही जण मोबाईल फोनवर रील्स शूट करतानाही आढळले. या प्रकरणात नाशिकरोड पोलिसांनी पाच ते सहा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासात हे व्हीडीओ मागील वर्षीचे असल्याचे निष्पन्न झाले असले तरी, इतक्या गंभीर सुरक्षाभंगानंतरही कारागृह प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई आणि देखरेखीचा अभाव अधोरेखित झाला आहे.
सुरक्षा प्रणालीवर प्रश्न, सखोल चौकशीची मागणी
नाशिकरोड कारागृहात अल्पावधीतच दोन गंभीर घटना घडल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. कैद्यांकडून मोबाईलचा वापर, अंमली पदार्थांची तस्करी आणि आता आत्महत्येचा प्रकार, या सर्व घटनांनी कारागृहाच्या अंतर्गत व्यवस्थापनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा घटना केवळ सुरक्षा त्रुटी नव्हे, तर कारागृहातील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचे प्रतीक आहेत. कैद्यांच्या समुपदेशनासाठी आणि सतत वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिस आणि कारागृह प्रशासनाने तपास सुरू केला असला तरी, ही घटना राज्यातील तुरुंग व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

