धाराशिव : प्रतिनिधी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल व कथित अनियमिततेच्या निषेधार्थ धाराशिव तहसील कार्यालयासमोर धाराशिव शहर काँग्रेस कमिटी व धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने गुरुवारी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी निदर्शने व आंदोलन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना जाऊन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, शहराध्यक्ष धनंजय राऊत, खालील सय्यद, शिवाजी गायकवाड, शीला उंबरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांना त्यांच्या दालनात जाऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात व निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
















