कोलकाता : वृत्तसंस्था
कोलकाता येथे महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच आता विद्यार्थीही सरकारविरोधात आक्रमक झाले असून, मंगळवारी विद्यार्थ्यांनी सचिवालयावर ‘नबन्ना मार्च’ काढला. हा मार्च दडपण्यासाठी कोलकाता पोलिसांनी ६,००० जवान रस्त्यांवर तैनात केले होते. या मोर्चावर लाठीमार करण्यात आला. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांत धुमश्चक्री झाली. यावेळी वॉटर गन आणि अश्रूधुराचा वापर करण्यात आला.
आज सकाळी आंदोलकांचा एक गट कॉलेज चौकात जमला आणि त्यांनी नबान्नाकडे कूच केली. बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि नागरिक मंच सहभागी झाले होते. आंदोलक त्यांच्या मार्गातील बॅरिकेड्स हलवत असल्याचे दृश्य दिसून आले. दुपारी १ च्या सुमारास हावडा आणि कोलकाता येथील विविध भागांतून निदर्शकांनी भारताचा झेंडा फडकावत सरकारविरोधी घोषणाबाजी करत राज्य सचिवालय ‘नबान्ना’कडे मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागले.
बॅरिकेटस् तोडले
हावडा येथील संत्रागाछी येथे आंदोलकांनी बॅरिकेटस् तोडला. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचाही वापर केला. दरम्यान, आंदोलक संत्रागाछी रेल्वे स्थानकावर गेले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.