नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सलग तिस-या दिवशी दिल्लीमध्ये राडा सुरू आहे. सलग दोन दिवस दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिस-या दिवशीही राहुल गांधी हे आक्रमक पवित्र्यात आहेत. महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाट या ठिकाणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी ठिय्या आंदोलन केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशातील लोकशाही संपवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या मदतीने त्यांनी लोकशाही संपवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली असून त्यासाठी इंडिया आघाडी चांगलंच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे आंदोलन सुरू आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना संपर्क करून त्यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती आहे. एसआयआर आणि निवडणूक आयोगातील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी आंदोलनात सहभागी होत ते आणखी मजबूत करण्यासाठी रणनीती बनवली जात आहे.
















