जयपूर: जयपूरमधील शहीद स्मारकावर सुरू असलेल्या एका आंदोलनादरम्यान आज जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. NEET पेपरफुटी, शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारीविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी जाहीरपणे कानशिलात लगावली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पक्ष समर्थकांनी दोन्ही तरुणांना पकडून घटनास्थळीच बेदम चोप दिला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कानशिलात मारणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
NEET पेपरफुटी आणि तरुणांच्या विविध समस्यांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी शेकडो आंदोलक शहीद स्मारकावर एकत्र आले होते. CJP प्रमुख अभिजीत दीपके आंदोलनस्थळी पोहोचले असता, समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून आत नेण्यास सुरुवात केली. याच गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात तरुण पुढे आले आणि त्यांनी दीपके यांच्या कानशिलात लगावली. या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि कार्यकर्त्यांनी त्या तरुणांना पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ एका तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले.
“हे लोक जिहादी मानसिकतेचे…” — हल्लेखोर तरुणाचा दावा
थप्पड मारणाऱ्या तरुणाने आपल्या कृत्याचे समर्थन करत दीपके यांच्यावर गंभीर आरोप केले. तो म्हणाला “हे लोक जिहादी मानसिकतेचे आहेत. मी जयपूरचाच रहिवासी असून एक राष्ट्रवादी नागरिक आहे. हा अभिजीत दीपक (दीपके) विनाकारण देशाची आणि तरुणांची दिशाभूल करत आहे. पेपरफुटीचा मुद्दा हे केवळ एक निमित्त आहे.”
आंदोलनात अनोखी निदर्शने आणि मोबाईल चोरीची धामधूम
या आंदोलनात सहभागी झालेले तरुण हातात तिरंगा आणि ‘मी माझ्या देशावर प्रेम करतो, मी भ्रष्टाचार नाकारतो’ तसेच ‘पेपरफुटी थांबवा’ अशा घोषणांचे फलक घेऊन आले होते. काही महिलाही आपल्या लहान मुलांसह आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी शहीद स्मारकाच्या प्रवेशद्वारावर कॉकरोचचे चित्र काढून “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!” अशा घोषणा लिहिल्या होत्या. दरम्यान, या गोंधळाचा फायदा घेत आंदोलनस्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटनाही घडली. यामुळे व्यासपीठावरून आंदोलकांना आपले मोबाईल आणि सामान सुरक्षित ठेवण्याचे वारंवार आवाहन करावे लागत होते.
“२० जून रोजी दिल्ली चलो!” — अभिजीत दीपके यांचे आवाहन
या हल्ल्याच्या घटनेनंतरही अभिजीत दीपके यांनी आंदोलकांना संबोधित केले. “हिंदू-मुस्लिम राजकारण आता चालणार नाही,” अशी घोषणा देत ते म्हणाले की, आपण जात आणि धर्मात विभागले गेलो आहोत, पण यात अडकून पडता कामा नये. आपला निर्धार पक्का असल्याचे सांगत “आम्ही येत्या २० जून रोजी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढणार आहोत. यावेळी जेव्हा आम्ही दिल्लीला जाऊ, तेव्हा (शिक्षणमंत्र्यांचा) राजीनामा घेतल्याशिवाय परत येणार नाही.” ‘दिल्ली चलो!’ च्या घोषणांनंतर राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली. या घटनेमुळे जयपूरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे.
















