पुणे: पुण्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणावर आता सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांनीही पले मौन सोडले आहे. रितेशने या घटनेचा तीव्र निषेध करत सरकारला तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
माध्यमांशी बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, “कायद्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर, जेव्हा जेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात, तेव्हा आपल्याला स्वाभाविकपणे मोठा धक्का बसतो. मनात दुःख आणि प्रचंड राग असतो. अशा वेळी जनतेचा आक्रोश बाहेर येणे हे नैसर्गिक आहे.”
रितेशने पुढे सरकारकडे मागणी करताना म्हटले की, “मला असे वाटते की, आता सरकारने स्वतःहून पुढे यायला हवे आणि या नराधमांच्या विरोधात योग्य तसेच अत्यंत जलद (Fast-track) निर्णय घ्यायला हवा.”
पुण्यातील या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रितेश देशमुख यांच्या या विधानाला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

