मॉस्को : रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या भीषण युद्धाला आता पाच वर्षे पूर्ण होत असतानाच, संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. मॉस्कोमध्ये आयोजित प्रसिद्ध वाल्दाई चर्चा क्लबला संबोधित करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नाटो देशांना थेट आणि अत्यंत कठोर शब्दांत संदेश दिला आहे.
जर बाल्टिक समुद्रातील रशियाच्या ‘कॅलिनिनग्राड’ या अत्यंत महत्त्वाच्या प्रदेशावर नाटोने कोणताही हल्ला केला किंवा लष्करी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला, तर रशिया प्रत्युत्तरादाखल अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा उघड इशारा पुतिन यांनी दिला आहे. एकाच तासाच्या कालावधीत पुतिन यांनी दोनदा या अण्वस्त्र वापराचा पुनरुच्चार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुतिन यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, रशियाचा कोणत्याही युरोपीय देशावर थेट चाल करून जाण्याचा किंवा हल्ला करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र, पाश्चात्त्य देशांकडून जर कोणतेही आक्रमक पाऊल उचलले गेले किंवा रशियन सीमेला धोका निर्माण झाला, तर रशियन सैन्य त्याला अत्यंत भीषण प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. नाटो सैन्याकडून कॅलिनिनग्राडच्या नजीक सातत्याने केल्या जाणा-या लष्करी सरावांमुळे आणि बाल्टिक समुद्रातून जाणा-या रशियन जहाजांना रोखण्याच्या धमक्यांमुळे मॉस्कोने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस रशियन परराष्ट्र मंत्रालयानेदेखील इशारा दिला होता की, हवाई किंवा सागरी नाकेबंदीचा कोणताही प्रयत्न युद्ध घोषित करण्यासारखा मानला जाईल.
कॅलिनिनग्राडचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व
कॅलिनिनग्राड हा रशियाचा असा एक अनोखा प्रदेश आहे जो रशियाच्या मुख्य भूभागाशी थेट जमिनीने जोडलेला नाही. हा छोटा भूभाग बाल्टिक समुद्राच्या किना-यावर वसलेला असून त्याच्या सीमा नाटोचे पूर्ण सदस्य असलेल्या पोलंड आणि लिथुआनिया या देशांना लागून आहेत. भौगोलिकदृष्ट्या मुख्य भूभागापासून वेगळा असल्यामुळे लष्करी दृष्टीने त्याला सुरक्षित ठेवणे रशियासाठी एक आव्हान असले, तरी त्याचे सामरिक महत्त्व प्रचंड मोठे आहे.
















