मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. राधाकृष्णन हे मुंबई, महाराष्ट्रातीलच मतदार आहेत. त्यामुळे सी.पी. राधाकृष्णन यांना महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मतदान करावे. तसेच महाराष्ट्राची अस्मिता सांगणा-या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी त्यांना समर्थन द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करणे ही आनंदाची बाब आहे. राधाकृष्णन हे जरी मूळचे तमिळनाडूचे असले तरीही ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे. मुंबईतील मतदार यादीत त्यांचे नाव आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराला आपण कुठले मतदार आहोत, याचा पुरावा जोडावा लागतो. त्यामुळे राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार म्हणून पुरावा लावणार आहेत असे फडणवीस म्हणाले.
आपल्या महाराष्ट्राचा माणूस उपराष्ट्रपती होतो आहे म्हणून राज्यातील सर्व खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान करावे. तसेच महाराष्ट्रात मतदान असलेला मतदार उपराष्ट्रपती होणार असल्याने त्यांना सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी बोलून दाखवली.

