मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन करत विक्रमी विजयाची नोंद केली. या विजयात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या शानदार खेळींसोबतच ३३ व्या वर्षी पदार्पण करणारा लेग स्पिनर रघु शर्मा लक्षवेधी ठरला.
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पण करणा-या या अनुभवी गोलंदाजाने दुस-या सामन्यात कढछ मधील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. लखनौ विरुद्धच्या सामन्यात मिळवलेली ही विकेट म्हणजे १५ वर्षांची त्याची तपस्या होती. त्यामुळेच त्याने भावूक होत खास नोट्स दाखवून या विकेट्सचा आनंद व्यक्त केला. मैदानातील त्याची ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या विकेटचा आनंद व्यक्त करताना रघुने आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली, ज्यावर एक भावनिक संदेश लिहिलेला होता.
गुरुदेवांच्या कृपेने माझ्या १५ वर्षांच्या अत्यंत वेदनादायक संघर्ष अखेर संपला. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे मन:पूर्वक आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम, असे त्या चिठ्ठीत लिहिले होते. क्रिकेटर्सच्या रुपात अल्प संधी मिळाल्यावर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनरच्या रुपात ओळख निर्माण करून क्रिकेटशी कनेक्ट राहण्याचा ध्यास जपणा-या लेग स्पिनर रघु शर्माला मुंबई इंडियन्सने वयाच्या ३३ व्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली.
या सामन्यात ४ षटकात २४ धावा खर्च करत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवणा-या रघुने लखनौ विरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत ३६ धावा खर्च करत पहिली आयपीएल विकेट आपल्या खात्यात जमा केली. १३ व्या षटकात रघुने लखनौच्या ताफ्यातून पदार्पण करताना षटकारासह खाते उघडणा-या अक्षत रघुवंशीला बाद केले.

