23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल गांधी ४ आणि ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात

राहुल गांधी ४ आणि ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण सतेज पाटील यांची माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे सा-यांचेच आराध्य दैवत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्यावर उभारलेला पुतळा कोसळला. त्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. या प्रकारानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आहेत. ४ आणि ५ ऑक्टोबर असा दोन दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. या दौ-यावर कोल्हापुरात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार असल्याची माहिती आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दिली.

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौ-यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणा-या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

कसा आहे दौरा?
राहुल गांधी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटय सादर करणार आहेत. यामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे, असे सतेज पाटील यांनी नमूद केले.

५ ऑक्टोबरला संवाद साधणार
५ ऑक्टोबरला सकाळी राहुल गांधी हे राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वधर्मीय लोक तसेच विविध एनजीओच्या प्रतिनिधींचा सहभाग असेल. यावेळी राहुल गांधी सर्वांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेसमध्ये इनकमिंग होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर ‘काँग्रेस ऑलरेडी हाउसफुल आहे, मात्र येणा-यांचे स्वागतच असेल’ असा सूचक संदेश सतेज पाटील यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR