27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeराष्ट्रीयमिनिटांत भाजीपाला देणा-या ‘ब्लिंकिट’वर छापा

मिनिटांत भाजीपाला देणा-या ‘ब्लिंकिट’वर छापा

मोठ्या गुन्ह्याशी निघतायेत कनेक्शन

नवी दिल्ली : घरातील किराणा सामान आणि भाजीपाला अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवणा-या ‘ब्लिंकिट’ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीच्या ख्याला परिसरात झालेल्या दोन हत्यांच्या तपासानंतर पोलिसांनी ब्लिंकिटच्या स्टोअर्सवर छापेमारी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमध्ये वापरलेले चाकू चक्क ब्लिंकिटवरून मागवण्यात आले होते, असा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तब्बल ५० बेकायदेशीर चाकू जप्त केले आहेत.

दिल्लीतील ख्याला भागात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, गुन्ह्यासाठी वापरलेले घातक चाकू त्यांनी ‘ब्लिंकिट’वरून ऑर्डर केले होते. हा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावून गेले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी स्वत: ग्राहक बनून या अ‍ॅपवरून चाकूची ऑर्डर दिली. १० मिनिटांत जेव्हा डिलिव्हरी आली, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. तो चाकू नियमानुसार बेकायदेशीर ठरणा-या बटनवाल्या चाकूंच्या श्रेणीत होता.

५० घातक चाकू जप्त, ब्लिंकिटला नोटीस
पुरावा हाती लागताच दिल्ली पोलिसांनी ब्लिंकिटच्या विविध स्टोअर्सवर छापेमारी केली आणि सुमारे ५० बेकायदेशीर बटन चाकू जप्त केले. कायद्यानुसार, ठराविक लांबीपेक्षा जास्त असलेले आणि बटन दाबून उघडणारे चाकू विकणे किंवा बाळगणे हा गुन्हा आहे. ब्लिंकिटवर अशा प्रतिबंधित वस्तूंची विक्री होत असल्याने पोलिसांनी कंपनीला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

इतर ऑनलाइन अ‍ॅप्सही रडारवर
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ ब्लिंकिटच नाही तर इतर अनेक ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरही आता संशयाची सुई आहे. हे चाकू कोणत्या सप्लायरमार्फत प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि या विक्रीवर कोणाचे नियंत्रण होते, याचा तपास सध्या सुरू आहे. ऑनलाईन कंपन्या आपल्या नफ्यासाठी लोकांच्या सुरक्षेशी खेळत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात दिल्ली पोलिस इतर कंपन्यांनाही दणका देण्याच्या तयारीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR