मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याच्या मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामे आणि कल्याण-डोंबिवलीच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दरम्यान, राज ठाकरे हे या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ डिसेंबरलाही ‘वर्षा’वर गेले होते.
त्यावेळी राज्यातील टोलनाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले होते.
मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सतत भेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आज पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून, विविध मुद्यांवर चर्चा देखील झाली आहे. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकासकामे व कल्याण-डोंबिवलीच्या विषयांवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याचवेळी आपल्या काही मागण्या राज ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा…
आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सतत होणा-या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहेत. विकास कामांसाठी आजची बैठक असल्याचे बोलले जात असले तरीही, या बैठकीत राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे.