मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे आणि शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. महापालिकेतील समीकरणावर व स्वीकृत नगरसेवकाबाबत या भेटीत चर्चा झाली असावी असा अंदाज आहे.
नुकत्यात राज्यात महापालिका निवडणूका पार पडल्या. यात मुंबईत दोघा ठाकरे बंधूंची युती होती. ठाकरे बंधू हे महायुतीविरोधात लढले. मात्र मुंबईत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी भविष्यात आपण राजकारणात लवचिक भूमिका स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता राज्यातील निवडणुकांचा हंगाम संपला आहे. या पार्श्वभूमीवर दोघांमधील भेटीला महत्व आले आहे. दोघांमध्ये सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली.
विकासकामांवर सहकार्याची भूमिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमध्ये मुंबई शहराच्या विविध विकासकामांवरही चर्चा झाली. कोस्टल रोड आदी प्रकल्पांमुळे नागरिकांना होणा-या गैरसोयीचा मुददा राज ठाकरे यांनी मांडला. विकासकामे करताना नागरिकांना गैरसोय होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विकासकामांना राज ठाकरे हे नेहमीच सहकार्याची भूमिका घेत असतात. विरोधी पक्ष आहे म्हणून विरोधासाठी विरोध असे ते कधी करत नाहीत. त्यामुळे यापुढेही चांगल्या पदधतीने होणा-या विकासकामांना आपले सहकार्यच असेल असे राज ठाकरे यांनी याबैठकीत सांगितल्याचे समजते.
महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने दोघे ठाकरे बंधू वीस वर्षांनंतर राजकीयदृष्टया एकत्र आले होते. या निवडणूक प्रचारात दोघांनी महायुतीविरोधात जोरदार टिकास्त्र सोडले. शिंदे गट आणि ठाकरे गट यात विळया-भोपळयाचे सख्य आहे. असे असतानाही राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

