कोल्हापूर : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर पक्षांकडून पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या सुरू आहेत. माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे आणि शिंदे गटाला पाठिंबा देणारे माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामध्ये काल तब्बल दीड ते दोन तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शरद पवार गटासोबत येण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात झालेल्या दोन पक्षांतील भूकंपाचे पडसाद हे राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात पडू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. यासाठी जिल्ह्यातील नेत्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी सर्वच या चारही गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या शिंदे गटासोबत आहेत. मात्र काल संध्याकाळी त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी अचानक भेट घेतली.
राजेश टोपे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध असल्याने ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, यड्रावकर आणि टोपे या दोघांमध्ये तब्बल दीड ते दोन तास बंद दरवाजाआड चर्चा झाली असून दोघात नेमकी काय चर्चा झाली अद्याप गुपित आहे. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडींवर खलबत झाले असून राजेश टोपे यांनी यड्रावकर यांना शरद पवार गटासोबत येण्याचे आवाहन केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चर्चे दरम्यान राजेश टोपे यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची वरिष्ठांसोबत फोनवरून बातचीत करून दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.