साऊथचा सुपरस्टार राम चरण याचा ‘पेद्दी’ हा नवा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले असून, रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने ९० कोटी रुपयांहून अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसला हादरवून सोडले आहे.
४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सुरुवातीपासूनच वेगवान गती पकडली आहे. ३ जून रोजी झालेल्या पेड प्रीव्ह्यूपासूनच या चित्रपटाचे यश स्पष्टपणे दिसून येत होते. सुरुवातीच्या दोन दिवसांत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे या चित्रपटाने ९० कोटींचा टप्पा सहज ओलांडला आहे.
या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असून शिवा राजकुमार आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले असून, ते प्रेक्षकांना विशेष भावत आहे. ग्रामीण भागातील एका खेळाडूचा संघर्ष आणि त्याची जिद्द अशी या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आहे.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिकचा टप्पा पार केल्यानंतर, जागतिक स्तरावरही ‘पेद्दी’ने शंभर कोटींपेक्षा जास्त कमाई केली असल्याचे ट्रेड विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. राम चरणचा हा चित्रपट आता लवकरच १०० कोटींचा आकडा ओलांडून अधिक मोठी झेप घेईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी काळात वीकेंडला हा चित्रपट आणखी किती विक्रम मोडीत काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















