बंगळुरू : वृत्तसंस्था
सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली होती. त्यांच्याबरोबर १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र, शपथविधीनंतर दोन दिवसांनी कर्नाटकच्या राजकारणात नाराजीनाटय रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता या नाट्यावर परदा पडला असून रामलिंगा रेड्डींनी यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे.
मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची रामलिंगा रेड्डी यांनी शपथ घेतली होती. पण शपथविधीनंतर दुस-या दिवशीच नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शनिवार दि. ६ जून रोजी रामलिंगा रेड्डी यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. काँग्रेसचे नेते तथा कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढली आहे. त्यानंतर अखेर रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे मागे घेतला आहे.
कर्नाटक काँग्रेस पक्षांतील मतभेद मिटवण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर रेड्डी यांनी राजीनामा मागे घेतला आहे. या संदर्भातील माहिती रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना दिली आहे. रामलिंगा रेड्डी हे काँग्रेस पक्षासाठी खूप महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा अनुभव पक्षासाठी अनमोल आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचा काही गैरसमज झाला होता. मात्र, आम्ही चर्चा केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे. रामलिंगा रेड्डी हे पक्षाचे निष्ठावान नेते आहेत आणि आता ते मंत्री म्हणून आपले काम सुरू ठेवतील. खरे तर भाजपाला धक्का बसला असेल, कारण त्यांना वाटले होते की ते सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतील. पण तसे झाले नाही असे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
















