मंगळवेढा – मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा पाठलाग करुन, धमकी देऊन तिच्याशी गेली पाच वर्षे शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी सचिन शंकर भोरकडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यातील पीडित महिलेच्या घराशेजारी आरोपी सचिन हा राहावयास असून पीडित महिला घरी एकटी असताना थेट बेडरुममध्ये येवून शारीरिक संबंधाची मागणी करु लागला. यावेळी पीडितीने तू माझ्या भावासारखा आहे असे म्हणून त्याला नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध केले. सदरचा प्रकार घरच्यांना समजल्यानंतर संसार मोडेल, या भीतीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतरही घरात पीडितेशिवाय दुसरे कोणी नाही हे पाहून तो घरी येऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध करत असे. हा प्रकार पीडितेच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर ती त्याला प्रतिकार करु लागली. तेव्हा तो पीडितेला मारहाण करुन शारीरिक संबंध करत असे. नकार दिल्यास मारुन टाकण्याची धमकी तसेच पतीला सांगण्याची धमकी देत असे, म्हणून पीडितेने आजपर्यंत हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
ती आरोपीच्या भीतीपोटी घराला कडी लावून बाहेर गेली, त्यावेळी आरोपी शोधत शोधत पीडितेकडे गेला व तिथेही तो जबरदस्ती करु लागला. त्यावेळी त्याला पीडितेने साफ नकार दिला असता, तू आता अशी का वागतेस, मला सारखे नकार का देते? असा म्हणाला. ग्रामदैवत यात्रेच्यावेळी पीडिता ही ड्यूटीवर असल्याने आरोपी पाठीमागे पाठलाग करत आला. घरी सासू, सासरे, पती असतानाही वारंवार फोन करुन तो पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असे, म्हणून पीडितेने फोन नंबर बदलला. ती कामावरुन घरी पायी येत असताना पाठीमागे येऊन त्याने पीडितेचा मोबाइल नेला. त्यानंतर संध्याकाळी पतीने आरोपीकडे मोबाइल तुझा कसा काय गेला? अशी विचारणा केली. त्यावेळी पीडितेने सर्व घडलेली हकीकत पतीला कथन केली. दरम्यान डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळाला भेट देऊन रातोरात शोधून आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले आहे.

