लातूर: देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) टीम सलग दुसऱ्या दिवशी ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसून आली. लातुरातील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या निवासस्थानी सीबीआयने सलग आठ तास कसून चौकशी केली. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या एका पथकाने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे मोटेगावकर यांच्या ‘ओमकार रेसिडेन्सी’ या निवासस्थानी भेट दिली. तब्बल आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर सीबीआयचे अधिकारी काही बॅगा आणि कागदपत्रे घेऊन बाहेर पडले. तिथून हे पथक थेट शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. या चौकशी दरम्यान नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत सीबीआयने अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
अटकेच्या बातम्या आणि मोटेगावकर कुटुंबाचा खुलासा
मोटेगावकर यांच्या चौकशीची बातमी पसरताच काही प्रसारमाध्यमांनी त्यांना अटक झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. मात्र, या वृत्ताचे मोटेगावकर यांच्या कुटुंबियांनी खंडन केले आहे. “प्रा. शिवराज मोटेगावकर यांना अटक झालेली नाही. केवळ चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. अटकेच्या बातम्या चुकीच्या आणि अफवा आहेत,” असे त्यांच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेबाबत सध्या तरी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
का होत आहे चौकशी?
एका पालकाने पोलिसांत तक्रार दिली होती की, लातुरातील एका खासगी संस्थेच्या सराव परीक्षेत (Mock Test) आलेले ४२ प्रश्न हे मूळ ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळणारे होते.यापूर्वी सीबीआयने लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतले आहे, जे एकेकाळी नीटच्या पेपर सेटिंग कमिटीमध्ये होते. त्यांच्याशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याची चर्चा आहे.
लातूरमध्ये खळबळ
‘लातूर पॅटर्न’मुळे शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या या शहरात सीबीआयच्या या मोठ्या कारवाईने शैक्षणिक संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. सीबीआयच्या २८ सदस्यांचे पथक सध्या लातूरमध्ये तळ ठोकून असून, आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















