मुंबई : कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता मराठवाड्यातील प्रत्येक गावातील शंभर टक्के रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणाबाबत मुंबईत झालेल्या शासकीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मागासवर्ग आयोगामार्फत केल्या जाणा-या या सर्व्हेक्षणाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पालिका आयुक्तांनी प्राधान्य द्यायचे असून आपापल्या जिल्ह्यात विशेष कक्षाच्या माध्यमातून कालबद्धरीतीने सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करायचे आहे.
सर्वेक्षण करण्यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना प्रश्नावली पाठवण्यात आली असून बिनचूक काम झाले पाहिजे. मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सर्वेक्षण उत्तम रीतीने होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे आपल्याला बाजू मांडता येईल. सर्वेक्षणाव्यतिरिक्त इतर माहिती देखील संकलित करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.