गांधीनगर : गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने गोहत्या प्रकरणात तीन मुस्लिम आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालात न्यायालयाने हिंदू धर्मातील वेद आणि मनुस्मृती या ग्रंथांचा उल्लेख करत गायींचे महत्त्व स्पष्ट केले. सध्या या प्रकरणाची देशभर चर्चा सुरू आहे.
गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला असून निकालाच्या सुरुवातीच्या चार पानांमध्ये न्यायालयाने गायींचे महत्त्व आणि हिंदू धर्मातील त्यांचे स्थान याविषयी भाष्य केले. यासाठी न्यायालयाने वेद आणि मनुस्मृतीतील संदर्भांचा उल्लेख केला. गायीला विश्वाची माता मानले जाते आणि तिच्यात ३३ कोटी देवतांचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे असे न्यायालयाने नमूद केले. मनुस्मृतीचा उल्लेख करताना गायीला केवळ एक प्राणी न मानता धर्माशी संबंधित महत्त्वाचे स्थान असल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकरणातील वसीम कुरेशी, मोहम्मद रफिक कुरेशी आणि असफाक बहेलिम या तिघांना गायीचे धार्मिक महत्त्व माहीत असूनही त्यांनी निर्दयपणे गोहत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले. कायद्यानुसार शिक्षा न झाल्यास भविष्यात गायींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
मांस विक्रीसाठी गोहत्या केल्याचा आरोप
न्यायालयात सादर झालेल्या माहितीनुसार, हे तिघे आरोपी कमी किमतीत जुन्या किंवा दूध न देणा-या गायी खरेदी करत होते. त्यानंतर त्यांची कत्तल करून मांस विक्रीचा व्यवसाय केला जात होता. पोलिसांनी मांस विक्रीची तयारी सुरू असताना आरोपींना पकडले. या कारवाईत सुमारे २७७ किलो गोमांस जप्त करण्यात आले. या प्रकरणात गुजरात प्राणी संरक्षण कायद्यातील सुधारित तरतुदी आणि प्राण्यांना क्रूरतेपासून संरक्षण देणा-या कायद्यासह इतर कलमांखाली आरोपींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येक आरोपीला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.
















