24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रमहापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत

महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत

सोडतीनंतर राजकीय घडामोडींना येणार वेग

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची सूचना जारी केली. या सोडतीनंतर मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमधील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग येईल. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

मुंबईसह २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल १६ जानेवारीला जाहीर झाले. महापौर पदाचे आरक्षण हा सत्ता स्थापनेतील पहिला टप्पा आहे. मात्र, महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली नसल्याने संबंधित महापालिका आयुक्तांना महापौर निवडीची प्रक्रिया सुरु करता येत नाही. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौ-यावर असल्याने महापौर आरक्षण सोडतीबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने २९ महापालिकांच्या महापौर पदासाठी येत्या गुरुवारी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षेतेखाली २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघेल. ही सोडत निघाल्यानंतर संबंधित आयुक्त महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्यासाठी सभागृह बैठकीची तारीख निश्चित केली जाईल. सभागृहाच्या पहिल्या बैठकीत महापौर निवड होईल.

नगर विकास विभागात सध्या महापौर आरक्षण सोडतीच्या तयारीची लगबग सुरु आहे. नव्याने गठीत करण्यात आलेल्या जालना आणि इचलकरंजी महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये कार्यकाळ संपण्याआधी शेवटचे महापौर पदाचे आरक्षण कधी लागू झाले आणि त्याची मुदत कधी संपली याची माहिती गोळा केली जात आहे. महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाते. त्यामुळे याआधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला काढले जाईल. आरक्षणासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेतला जाणार. आरक्षणाच्या प्रमाणाला २९ या संख्येने भागून महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण निश्चित होईल. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असणार आहे, अशी माहिती नगरविकास विभागाच्या अधिका-याने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR