परभणी : सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील ट्वेन्टीवन शुगर्स लि. व पापदंडेश्वर वनराई फाऊंडेशन, पिंपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गाढे पिंपळगाव येथे पूर्वहंगामी ऊस लागवड व जमिनीचा सेंद्रीय कर्ब व्यवस्थापन परिसंवाद संपन्न झाला. सदर कार्यक्रम ट्वेन्टीवन शुगर्स लि. चे चेअरमन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, व्हाईस चेअरमन विजय देशमुख आणि कार्यकारी संचालक सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र आंबेजोगाईचे कृषी विद्यावेत्ता प्रा. अरुण गुट्टे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ट्वेन्टीवन शुगर्सचे ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी केले. त्यांनी ऊस लागवड करताना होणा-या सामान्य चुका, मागील हंगामात दिसून आलेल्या कीड व रोगांच्या समस्यांचा पुढील हंगामात प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना बाबत ऊहापोह केला. तसेच ऊसतोड झाल्यानंतर शेतात राहिलेल्या पाचटाचे व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
प्रमुख वक्ते प्रा. अरुण गुट्टे यांनी ऊसाचे उत्पादन घटण्यामागील प्रमुख कारणांवर प्रकाश टाकला. बहुतांश शेतकरी १० ते ११ महिन्यांमध्येच ऊस तोडतात, त्यामुळे वजन वाढण्याआधीच तोडणी केली जाते. तसेच शिफारस केलेल्या ऊस जातींचा अभाव, सेंद्रिय व रासायनिक खतांचा असमतोल वापर, योग्य वेळी बाळबांधणी आणि मोठी बांधणी न करणे ही ऊस उत्पादन घटण्याची कारणे असल्याचे नमूद केले. उत्पादनवाढीसाठी जमिनीची योग्य मशागत व सेंद्रिय खतांचा वापर, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तसेच वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी शिफारस केलेल्या को ८६०३२, फुले १०००१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६ या ऊस जातींची निवड, वेळेत तण व्यवस्थापनासाठी योग्य तणनाशकांचा वापर, ऊसाच्या वयानुसार खत व्यवस्थापन, फुटवे फुटण्याच्या अवस्थेनुसार योग्य वेळेत बाळ व मोठी बांधणी करणे बाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करून यामुळे प्रति एकर ६० टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त कृषी उपसंचालक गुरुनाथ थोन्टे यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अधोरेखित करताना, शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता वाढते, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे डॉ. अशोक ढवण यांनी ऊस शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी योग्य नियोजनाचे महत्त्व स्पष्ट केले. मुख्य शेतकी अधिकारी तुकाराम गडदे यांनी कारखान्यामार्फत शेतक-यांना उधारीवर बेणे तसेच अनुदानित ऊस रोप उपलब्धता योजनेची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष काशिनाथराव राडकर, जि.प. माजी सभापती प्रभाकर वाघमोडे, सरपंच अमोल घुमरे, उपसरपंच पांडुरंग गंगणे, ऊस पुरवठा अधिकारी रतन कदम, विलास देशमुख, चंद्रकांत थोन्टे, माजी सरपंच चंद्रकांत सोनवणे, वसंतराव सोनवणे, भाऊ राडकर, भगवान राडकर, विद्याधर देशमुख, धनंजय कराड, प्रदीप सोनवणे, श्रीपती राडकर, दशरथ अरसुळे, दामोदर राडकर, कांता सोनवणे, दत्तात्रय सोनवणे यांच्यासह कारखान्याचे कृषी पर्यवेक्षक भगवान सोळंके, विठ्ठल लाटे, कृषी सहाय्यक गौतम मुंडे, माणिक सोळंके, विजय सोळंके, ज्ञानेश्वर कचगुंडे, दत्तात्रय गवळी, रमेश आपेट, शरद शिंदे, स्लिप बॉय खंडू गाढवे, माऊली हिंगणे, लक्ष्मण काटे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

