नवी दिल्ली : दिवाळीसह सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी, डिजिटल व्यवहार, प्रवासाचे आरक्षण आणि कुरिअर सेवांचा वापर वाढत असल्याने सायबर गुन्हेगार सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात फिशिंग, आर्थिक फसवणूक आणि वैयक्तिक माहिती चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा सायबर सुरक्षा क्षेत्रातील आर्क्टिक वुल्फ या कंपनीने दिला आहे.
कंपनीचे भारतातील अभियांत्रिकी विभागाचे उपाध्यक्ष देवेंद्र राठ यांच्या मते, सणासुदीच्या काळात ग्राहक आणि व्यवसायांसाठी अनेक संधी निर्माण होतात; मात्र, याच काळाचा फायदा सायबर गुन्हेगारही घेतात. आकर्षक ऑफर, एमर्जन्सी मेसेजेस आणि विश्वासार्ह वाटणा-या लिंकच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. सायबर गुन्हेगार ऑनलाइन खरेदीवरील मोठ्या सवलती, कुरिअर किंवा डिलिव्हरीचे संदेश, लॉयल्टी रिवॉर्ड, बँकिंग अलर्ट, करासंबंधी सूचना, बनावट बिले आणि खाते पडताळणीच्या नावाखाली फसवणूक करू शकतात. ग्राहकांना एसएमएस, व्हॉटस्अॅप ई-मेल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद लिंक पाठवल्या जाऊ शकतात.
आर्क्टिक वुल्फच्या सायबर धोका संशोधकांच्या निरीक्षणानुसार, अनेक यशस्वी सायबर हल्ल्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा लोकांचा विश्वास, घाई आणि परिचित व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाचा वापर केला जातो. व्हॉटस्अॅप वरील विश्वासार्ह कोन्टॅक्ट्सच्या माध्यमातूनही बनावट संदेश पसरवले जाऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये हॅकर्स सक्रिय व्हॉटस्अॅप खात्यांचा गैरवापर करून ओळखीच्या व्यक्तींच्या नावाने संदेश पाठवतात. त्यामुळे संदेश परिचित व्यक्तीकडून आल्यासारखा वाटतो आणि फसवणुकीची शक्यता वाढते.
या काळात अधिकृत अॅप स्टोअरच्या बाहेरून डाउनलोड केल्या जाणा-या बनावट व्हॉटस्अॅप अॅप्सचाही धोका वाढू शकतो. कुरिअर डिलिव्हरी, केवायसी अपडेट, वीजबिल, बँक खाते बंद होण्याची सूचना, टॅक्स नोटीस किंवा वाहतूक सेवांच्या नावाखाली एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. असे अॅप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर पासवर्ड आणि बँकिंग माहिती चोरणे, ओटीपी अडवणे, मोबाइलवरील नोटिफिकेशन्स वाचणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक करणे शक्य होते. कंपन्यांनाही याचा मोठा फटका बसू शकतो.
लिंक उघडू नका
कर्मचा-यांनी फसव्या ई-मेलमधील लिंक उघडल्यास कंपनीच्या ई-मेल खात्याचा ताबा मिळवणे, क्लाउड प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश, बनावट पेमेंट, रॅन्समवेअर हल्ले आणि कामकाजात व्यत्यय आणण्याचे प्रकार घडू शकतात. सायबर गुन्हेगार आता केवळ तांत्रिक त्रुटींऐवजी डिजिटल ओळख प्रणाली, विश्वासार्ह संदेशवहन सेवा आणि तृतीय पक्षांशी असलेल्या व्यावसायिक संबंधांना लक्ष्य करत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
काय टाळावे?
सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद एपीके फाइल डाउनलोड करणे किंवा ओटीपी आणि बँकिंग तपशील शेअर करणे टाळावे. ऑफर, कुरिअर, केवायसी किंवा बँकेसंबंधी संदेश आल्यास संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून त्याची पडताळणी करावी. कंपन्यांनी ई-मेल, क्लाउड सेवा आणि दूरस्थ प्रवेशासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू करावे, इंटरनेटशी जोडलेल्या प्रणालींमधील सुरक्षा त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि कर्मचा-यांना फिशिंग व पेमेंट फसवणुकीबाबत प्रशिक्षण द्यावे, अशी शिफारस देवेंद्र राठ यांनी केली.
















