मोहाली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सचा (आरआर) संघ सातत्याने वादात सापडताना दिसत आहे. आधी संघाच्या कोचिंग स्टाफने सामन्यांदरम्यान मोबाईल फोनचा वापर केला होता आणि आता तर संघाचा कर्णधार रियान पराग यानेच सर्व मर्यादा पार केल्या आहेत. त्यामुळे तो मोठ्या अडचणीत सापडू शकतो आणि त्याच्यावर कारवाईची टांगती तलवारही आहे. कारण पंजाब किंग्जविरोधात २८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यादरम्यान, रियान परागचा एक फोटो समोर आला असून त्यामुळेच मोठी खळबळ माजली आहे.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानचा कर्णधार असलेला रियान हा, संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये व्हेप (ई-सिगारेट) वापरताना कॅमे-यात कैद झाला. दुस-या डावाच्या १६ व्या ओव्हरदरम्यान रेकॉर्ड झालेला या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे तो व्हेपिंग करत असताना एकटाच नव्हता, तर तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बाकीचे खेळाडूही उपस्थित होते. रियान परागच्या या कृतीमुळे केवळ त्याच्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनावरही बोट ठेवले जात आहे
.
मंगळवारी (२८ एप्रिल) मुल्लानपूर येथील पीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पंजाब वि. राजस्थान सामन्यादरम्यान घडलेल्या घटनेप्रकरणी, बीसीसीआय कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. रियान परागने केलेले कृत्य हे खेळाडू आणि अधिका-यांसाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ चे उल्लंघन असून, ते खेळाची बदनामी करण्यासारखे आहे. याबद्दल मॅच रेफरी त्याला अधिकृत ताकीद देऊ शकतात, किंवा खेळाडूच्या सामना शुल्कातून काही भाग कापला जाऊ शकतो, अन्यथा निलंबनाची शिक्षाही देण्यात येऊ शकते.
राजस्थान रॉयल्सचा संघ आधीही सापडला होता वादात
आयपीएल २०२६ मधील राजस्थान रॉयल्सच्या सर्वांत मोठ्या विजयानंतर ही घटना घडली आहे. लीगमधील अपराजित संघ पंजाब किंग्जविरुद्ध, राजस्थान रॉयल्सने शेवटच्या षटकात २२३ धावांचे लक्ष्य पूर्ण करून ६ गडी राखून विजय मिळवला. परागने १६ चेंडूंमध्ये २९ धावा केल्या. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ तिस-या स्थानावर पोहोचला, मात्र याच विजयासोबत त्यांनी आपल्या नावावर आणखी एका मैदानाबाहेरील वादाची भर घातली.

