नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली असून भारतीय बँका आणि नियामक संस्थांमध्ये नागरिकांचे सुमारे १.८४ लाख कोटी रुपये पडून आहेत, ज्यावर अद्याप कोणीही दावा केलेला नाही. हे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून लवकरच ते मूळ दावेदार किंवा त्यांच्या कुटुंबांना परत केले जातील असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासाठी गांधीनगरमध्ये आपकी पूंजी, आपका अधिकार’ या तीन महिन्यांच्या विशेष मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
वित्त सेवा विभागाच्या माहितीनुसार, ही १.८४ लाख कोटी रुपयांची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वितरित आहे. ठेवी आणि विमा: निष्क्रिय बँक ठेवी, विमा कंपन्यांमधील रक्कम, लाभांश, म्युच्युअल फंड आणि पेन्शन फंडमधील रक्कम यांचा यात समावेश आहे. अर्थमंत्र्यांनी जनतेला आश्वासन दिले की, हा पैसा केवळ कागदी अंक नसून सामान्य कुटुंबांची कष्टाची कमाई आहे. हे सर्व पैसे दावेदारांना परत मिळेपर्यंत सरकार संरक्षक म्हणून काम करेल. हा अनक्लेम्ड पैसा सध्या बँका, भारतीय रिझर्व्ह बँक आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये जमा आहे. तुम्हीही आरबीआयच्या यूडीजीएएम पोर्टलवर जाऊन तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या नावाने दावा न केलेली कोणतीही रक्कम आहे का, हे तपासा आणि या ऐतिहासिक मोहिमेचा लाभ घ्या.
‘३-अ’ मॉडेलवर अभियान कार्यान्वित
या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांनी केलेली बचत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबांना परत मिळावी, हा आहे. हे अभियान ‘३-अ’ मॉडेलवर आधारित आहे. नागरिकांत जागरूकता म्हणून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कुठे आहेत, हे शोधण्यास मदत करणे. तसेच सुलभतेसाठी दावा न केलेल्या रकमेपर्यंत पोहोच सुलभ करण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करणे. तर कृतीतून दाव्याचा निपटारा वेळेवर पूर्ण करणे.
डिजिटल पद्धतीनेही दावा कसा कराल?
अर्थमंत्री सीतारमण यांनी नागरिकांना लहान गरजांकडेही दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले आहे. दाव्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने डिजिटल पोर्टल्सचा वापर सुरू केला आहे.
यूडीजीएएम : भारतीय रिझर्व्ह बँकेचे यूडीजीएएम (अनक्लेम्ड डिपॉझिट गेटवे टू अॅक्सेस इन्फॉर्मेशन) पोर्टल नागरिकांना दावा न केलेली रक्कम शोधण्यास मदत करते.
दावा प्रक्रिया : नागरिकांनी योग्य ती कागदपत्रे घेऊन जवळच्या बँका किंवा संबंधित संस्थांकडे जावे. वित्तमंत्र्यांनी सल्ला दिला आहे की, तुम्ही एकदा दावा दाखल करताच, तुम्हाला तुमचा पैसा मिळतो.

