मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि भारतीय शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतल्याने रुपया प्रति डॉलर ९२ रुपयांच्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. रुपयाच्या या घसरणीमुळे देशांतर्गत महागाईचा भडका उडण्याची दाट शक्यता असून, आयातदार, विद्यार्थी आणि पर्यटकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
जानेवारी २०२६ या एकाच महिन्यात रुपया २ टक्क्यांहून अधिक (२०२ पैसे) कमकुवत झाला आहे. तर संपूर्ण २०२५ या वर्षात रुपयात ५ टक्क्यांची घसरण झाली होती. या घसरणीमागे प्रामुख्याने दोन मोठी कारणे आहेत. भारत आपल्या इंधनाच्या गरजेपैकी ८५% तेल आयात करतो. कच्च्या तेलासाठी आता अधिक डॉलर मोजावे लागणार असल्याने पेट्रोल, डिझेल आणि विमानाचे इंधन महाग होईल.
महाग होणा-या वस्तू
मोबाईल सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कोळसा, रसायने, खाद्यतेल आणि खते महागणार आहेत. परदेशात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आता जास्त फी भरावी लागेल, तसेच विदेशी सहलींसाठी डॉलर खरेदी करणे खर्चिक होणार आहे.
निर्यातदार आणि अनिवासी भारतीय
ज्या कंपन्या वस्तूंची निर्यात करतात, त्यांना डॉलरच्या बदल्यात जास्त रुपये मिळतील, ज्यामुळे त्यांचा नफा वाढू शकतो. विशेषत: टेक्सटाईल (कापड) सारख्या क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल, कारण त्यांची आयातीवर अवलंबून राहण्याची गरज कमी आहे. तसेच, परदेशातून भारतात पैसे पाठवणा-या एनआरआय बांधवांच्या कुटुंबीयांनाही जास्त पैसे मिळतील.
व्यापार तूट आणि उद्योगांची स्थिती
डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, भारताची व्यापार तूट २५.०४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कच्च्या तेलाची आयात ६ टक्क्यांनी वाढली असून चांदीची आयात चक्क ८० टक्क्यांनी उसळली आहे. मात्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि जेम्स अँड ज्वेलरी सारख्या क्षेत्रांना रुपयाच्या घसरणीचा फायदा कमी होतो, कारण त्यांना कच्चा माल मोठ्या प्रमाणावर आयात करावा लागतो आणि वाढलेला उत्पादन खर्च त्यांचा नफा खाऊन टाकतो.

