सूमी : रशियाने युक्रेनमधील सूमी शहरात भारतीय उद्योगपती राजीव गुप्ता यांच्या औषधनिर्मिती कारखान्यावर ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
कारखान्याच्या मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले असून तिचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कंपनीचे किमान ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर कारखाना परिसरातून धुराचे मोठे लोट उठताना दिसले. अधिका-यांनी सांगितले की, मृत आणि जखमींची संख्या पुढे बदलू शकते. हा कारखाना रशियाच्या सीमेपासून सुमारे २३ किलोमीटर अंतरावर आहे. हा कारखाना कुसुम ग्रुपचा आहे. भारतीय नागरिक राजीव गुप्ता ही कंपनी चालवतात. ते १९९० च्या दशकात युक्रेनमध्ये गेले होते आणि तिथेच त्यांनी कुसुम ग्रुपचा व्यवसाय उभा केला.
कंपनीने १९९४ मध्ये भारतातील औषधे युक्रेनमध्ये पाठवणारी वितरक कंपनी म्हणून काम सुरू केले होते. १९९६ मध्ये युक्रेनमध्ये तिची औपचारिकपणे कंपनी म्हणून स्थापना करण्यात आली. कुसुम ग्रुपचे मुख्यालय युक्रेनची राजधानी कीव येथे आहे. युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख भारतीय औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये त्याची गणना केली जाते.
















