बुलडाणा : प्रतिनिधी
दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’या पुस्तकावरून आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवागाळ केली होती. शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली. टीकेनंतर काल आमदार संजय गायकवाड यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. मुलाने अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर येताच नागरिकांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या अश्लील शिवीगाळीच्या ऑडिओ क्लिपनंतर त्यांच्या मुलाची व्हीडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यावरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुणाल गायकवाड असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. कुणाल गायकवाड हे कारच्या बोनेटवर उभे राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.
कुणाल यांचा व्हीडीओ नगर परिषद निवडणुकीदरम्यान व्हायरल झाला होता. मात्र पुन्हा हा व्हीडीओ व्हायरल झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कुणाल गायकवाड हे बुलडाणा नगर परिषदेचे सदस्य असून नगर परिषदेतील गटनेता सुद्धा आहेत.
त्यांनी नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी असलेल्या नेत्याच्या घरासमोर कारच्या बोनेटवर उभे राहून अश्लील शिवीगाळ करत आव्हान दिले होते. त्यांच्या व्हायरल होणा-या व्हीडीओची साम टीव्ही पुष्टी करत नाही. परंतु हा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दीपक केदार यांचा अनोखा इशारा
बुलडाणा येथे राजकीय वातावरण तापले असून ऑल इंडिया पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी आमदार गायकवाड यांना अनोख्या शैलीत इशारा दिला आहे. आमचं आणि शिव्यांचं नातं खूप जुनं आहे. गरज पडली तर बुलडाण्यात शिवीगाळ परिषद आयोजित करू.

