Homeमहाराष्ट्रसंत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार

संत गाडगे बाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प नुकताच सभागृहासमोर सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पातून विकसित महाराष्ट्र २०२७ च्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवांना अभिवादन करत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

या अर्थसंकल्पातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्माला ११ एप्रिल २०२७ रोजी २०० वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान यांना जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल. यासोबतच संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान आणि ७५ गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने जीवनमान उंचावण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पायाभूत सुविधांच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल. महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून सन २०२६-२७ हे सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे केले जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजनाही सुरू करण्यात येणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR