बीड : स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणा-या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थितीत राहण्यासाठी केज तालुक्यातील मस्साजोग येथील महिला सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित केले आहे.
बीडचे जिल्हाधिका-यांनी हे निमंत्रण खास दुताकरवी सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला असून महाराष्ट्रातील त्या एकमेव सरपंच ठरल्या आहेत. याप्रकारे मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या पाणीदार शिवाराची दखल राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाल्यानंतर उपसरपंच असलेल्या वर्षा आनंदराव सोनवणे यांची १ जानेवारी २०२५ रोजी सरपंचपदी वर्णी लागली होती.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशन यांच्या वतीने दि. ५ मे २०२४ पासून मस्साजोग परिसरातील नदी खोली करण, तलावातील गाळ उपसा करुन तलावाचे ही खोलीकरण केले होते. दरम्यान पंधरा दिवसानंतरच अवकाळी पाऊस आल्यामुळे नदीच्या पात्रात व तलावातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे मस्साजोग शिवारातील बोअर व विहिरीतील पाणी पातळी वाढत सारा शिवार पाणीदार झाला होता. याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन याचा अहवाल दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाला पाठवला.
गावासाठी केलेल्या या कामाची दखल स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून मस्साजोगच्या सरपंच वर्षा सोनवणे यांच्यासह त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे होणा-या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे हे बुधवारी सकाळीच दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रातून एकमेव सरपंचाची निवड
नाम व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवारातील नदी खोलीकरण व तलावातील गाळ काढून केलेल्या तलावाच्या खोलीकरणामुळे सारा शिवार पाणीदार झाल्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातून मस्साजोगच्या एकमेव सरपंच वर्षा सोनवणे यांना हा बहुमान मिळणार आहे. सोनवणे दाम्पत्याची दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय माती आणि पदार्थ संशोधन केंद्राच्या सदनात (सीएसएमआरएस) थांबण्याची व्यवस्था केल्याची माहिती तेथील संपर्क अधिकारी रजत जांगिड यांनी दिली.

