लातूर : प्रतिनिधी
केंद्र सरकारने नवीन मोटार अपघात कायदा आणला आहे. हा कायदा सर्वच वाहनचालकांवर अन्याय करणारा आहे. या कायद्याच्या निषेधार्थ आज दि. ३ जानेवारी रोजी लातूर शहरातील स्कुलबस बंद (विद्यार्थी वाहतूक) राहणार असल्याची माहिती शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापक अध्यक्ष हणमंत गोत्राळ-पाटील यांनी दिली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी लातूर शहरात सर्व वाहतूकदार संघटनांची बैठक होऊन ड्राव्हर बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली असून आज या समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
शैक्षणिक हब बसलेल्या लातूर शहरात ४०० पेक्षा अधिक स्कूल बसेस आहेत. दररोज सकाळी ६ वाजल्यापासून स्कूल बसेसची सेवा सुरु होते. दारावर जाऊन विद्यार्थी घेत विद्यार्थ्यांना त्या त्या शाळांपर्यंत नेवून सोडण्याचे काम स्कूल बसची यंत्रणा करीत असते. परंतू, सोमवारी अचानक ट्रक चालकांनी आंदोलन सुरु केले. त्याचा परिणाम डिझेल, पेट्रोलच्या वाहतूकीवर झाला. त्यामुळे लातूर शहरात डिझेल, पेट्रोलचा स्टॉक संपला. जवळपास सर्वच स्कुल बस चालकांना डिझेल मिळाले नाही. त्यामुळे स्कूल बसमध्ये डिझेल असेपर्यंत एकादी ट्रिप झाली. डिझेलअभावी स्कूल बसचालकांची अडचण झाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत नेले आणि आणलेही. सरकारने नवीन कायदे करावेत. परंतू, सरकारने कोणावही अन्याय होऊ देऊ नये, असे नमुद करुन ड्रायव्हर हितार्थ सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही हणमंत गोत्राळ पाटील यांनी केले आहे.
दरम्यान शहरातील सर्व वाहतूकदार संघटनांची मंगळवारी येथील पाटील प्लाझा येथे बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारच्या ‘हिट अॅण्ड रन’ या कायद्याबद्दल अतिश्य तीव्र शब्दात प्रतिक्रीया उमटल्या. या बैठकीस लातूर जिल्हा युवा मोटर मालक संघ, लोकनायक मोटार मालक संघ लातूर, लातूर जिल्हा मोटर मालक संघ, शिव सेवक समिती मालक वाहतूक, विलासराव देशमुख वाहतूक संघटना, लातूर जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्स असोशियन लातूर, राजीव गांधी टॅक्सी युनियन ओन्ली ड्रायव्हर बंधू, मनसे वाहतूक संघ, ऑटो युनियन, लातूर जिल्हा मालवाहतूक टेम्पो संघटना, एकता मोटार मालक धक्का संघटना, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना, ट्रॅक्टर युनियन, नेताजी ऑटो युनियन, टिप्पर संघटना, वाळू संघटना, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थि होते.
या बैठकीत ड्रायव्हर बचाव कृती समिती स्थापना करण्यात आली. पदाधिकारी या प्रमाणे आहेत. लातूर जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील, कार्याध्यक्ष उत्तम लोंढे, उपाध्यक्ष जुगलकिशोर तोष्णीवाल, सचिव योगेश पल्ले, सहसचिव कृष्णा पाडे कोषाध्यक्ष गणेश बेसके, सदस्य महादेव कुलकर्णी, महादेव जाधव, अब्दुल गफफार पठाण, खयुम शेख, मारुती सावंत, मुख्तार शेख, वाहेद शेख यांचा समावेश आहे. दरम्यान विविध वाहतूकदार संघटनांच्या वतीने या आंदोलनास पाठींबा देण्यात आल्याने विविध प्रकारची वाहतूक बंद झाली. त्याचा परिणाम भाजीपाल, दुध, अंडी आदीच्या वाहतूकीवर झाला आहे.