बदलापूर : प्रतिनिधी
बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी रात्री दहा वाजल्यापासून बंद केली होती. आज गुरुवारी सकाळी पुन्हा इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. शहरातील एकूण वातावरण पूर्वपदावर येत असताना पोलिसांनीही इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दैनंदिन आर्थिक व्यवहार गुगल पे, फोन पे च्या माध्यमातून मोबाईलद्वारे होत असतात, मात्र इंटरनेट बंद असल्यामुळे अनेकांची अडचण होत होती. शहरातील वातावरण पूर्णपणे निवळल्यामुळे पोलिसांनी आता इंटरनेट सेवा सुरू करण्यास मोबाईल कंपन्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरातील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहर पूर्वपदावर आले असले तरी शहरातील प्रमुख चौकात, रेल्वे पोलिस स्टेशन परिसर तसेच शाळेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ज्या शाळेत अनुचित प्रकार घडला ती शाळा आजही (गुरुवारी) बंद असून उर्वरित शाळांमध्ये मात्र नियमित वर्ग आजपासून सुरू करण्यात आले आहेत. बुधवारी शहराला विस्कळीत झालेला दूध पुरवठाही सुरळीत झाला असून शहराचे एकूण जीवनमान आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र बदलापूरकरांच्या मनात असलेला रोष कायम असून प्रत्येक ठिकाणी याच मुद्यावर नागरिक चर्चा करत आहेत.