प्रयागराज : प्रयागराजमधील अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. ४८ तासांच्या आत प्रशासनाने अविमुक्तेश्वरानंद यांना दुसरी नोटीस पाठवली आहे. मौनी अमावस्येला अडथळे तोडून जबरदस्तीने गर्दीत गाडी ढकलल्याबद्दल त्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांना प्रश्न विचारले आहेत.
माघ मेळयातून त्यांना कायमची का बंदी घालू नये अशी विचारणा प्रशासनाने केली आहे. जर २४ तासांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर संस्थेला दिलेली जमीन व इतर सुविधा परत घेऊ असे प्रशासनाने म्हटले आहे. अविमुक्तेश्वरानंद यांचे मीडिया प्रभारी शैलेंद्र योगीराज यांनी सांगितले की, प्रशासनान बुधवारी संध्याकाळी ७ वाजता छावणीच्या मागे एक नोटीस लावली, ज्यावर १८ जानेवारी तारीख लिहिलेली होती. अविमुक्तेश्वरानंद यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता दुस-या नोटीसला तीन पानांचे उत्तर मेळा कार्यालयाला पाठवले.
परंपरेत खंड पाडण्याचा अधिकार
कोणालाही नाही : योगी
दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी अविमुक्तेश्वरानंद यांचे नाव न घेता सांगितले. परंपरेत खंड पाडण्याचा अधिकार कोणालाही नाही. धर्माच्या नावाखाली सनातन धर्म कमकुवत करण्याचा कट रचणारे असे अनेक दुष्कर्म करणारे आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. एका भिक्षूसाठी धर्म आणि राष्ट्रापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.

