पुणे : प्रतिनिधी
लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याला यावर्षीचा साखर उद्योगातील तांत्रिक कार्यक्षमता विभागात उच्च उतारा गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
तसेच ऊस विकास गटात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सोलापूर येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना जाहीर करण्यात आला आहे. ते म्हणाले, येत्या २२ आणि २३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबरोबर दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावर साखर उद्योग परिषद घेण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहणार आहेत. सन २०२५ आणि २६ या दोन वर्षातील हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. दोन्ही वर्षातील एकूण ५७ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक २१ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर सर्वोकृष्ट ऊस विकास, तांत्रिक क्षमता, आर्थिक व्यवस्थापन, उकृष्ट आसवणी प्रकल्प, सर्वाधिक साखर उतारा, सामाजिक दायित्व, सर्वोकृष्ट साखर कारखाना, असे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संपूर्ण देशांमधून सर्वाधिक १०२ सहकारी साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. भारतीय सहकारी साखर उद्योगातील प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जाहीर करण्यात आला आहे तर देश स्तरावरील सर्वोकृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांना जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी सांगितली.
















