मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस आणि ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर आले. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यानिमित्त या नेत्यांची विशेष उपस्थिती लाभली. विविध निवडणुकांनंतर आता प्रथमच हे तीन नेते एकत्र आल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी नेत्यांनी मिश्किल टोलेबाजी करीत कार्यक्रमात रंगत आणली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरे बंधूंमध्ये बंददाराआड गुप्तगू झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित महाराष्ट्राच्या हास्यरेषा या मराठी व्यंगचित्रकलेचा १०० वर्षांचा प्रवास उलगडणा-या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला.
या सार्वजनिक कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवातीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा पार पडली. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
या तिन्ही नेत्यांच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरेंट पॉवर प्रकल्पाच्या मुद्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याचसोबत ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागांवर तर महायुतीने दोन विजय मिळवला. यावरून महायुतीत शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच हे गुप्तगू झाल्याने या चर्चेला विशेष महत्त्व आहे.
दोन्ही ठाकरे बंधूंनी मला काम करू द्यावे
या कार्यक्रमात टोलेबाजीने रंगत आणली. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे बोलावले तर मुख्यमंत्री येतात, असा उल्लेख केला. त्यावर राज ठाकरे यांनी याच्यापुढे मी बोलवत जाईन आणि ते येत जातील. पण २०२९ पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झाले, असा शेलार यांना मिश्किल टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मी राजकारणात काम करायला तयार आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंनी मला काम करू द्यावे, असा टोला लगावत कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली.
















