नवी दिल्ली : नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकतीच संसदीय समितीची भेट घेतली. त्यांनी परीक्षा प्रणाली सुरक्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली. या बैठकीत एनडीएचे महासंचालक अभिषेक सिंह आणि नॅशनल मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष अभिजात शेठ उपस्थित होते.
समितीच्या सदस्यांनी सूचना केली की, आपण अमेरिका आणि चीनसारख्या देशांकडून शिकले पाहिजे. तिथे कोणत्याही तक्रारीशिवाय परीक्षा होतात. परदेशात वापरल्या जाणा-या चांगल्या पद्धतींपासून शिका आणि अशी प्रणाली (सिस्टम) अवलंबवा जेणेकरून देशातील परीक्षा व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत होईल. दरम्यान, भारतात चीनच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी एक व्हीडीओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी गाओकाओला जगातील सर्वात मोठी परीक्षा म्हटले आहे. तसेच लिहिले आहे की ही भारताच्या जेईई-नीटचे संयुक्त स्वरूप आहे. २ दिवसांत १.३ कोटी विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. त्यांच्यासाठी कारखान्यांनी काम थांबवले. रस्ते निर्मनुष्य झाले. संपूर्ण देश विद्यार्थ्यांसाठी एकवटला.
भारतात नीटसाठी साधारणपणे २० लाखांहून अधिक आणि जेईईसाठी सुमारे १५ लाख उमेदवार बसतात. २०२६ मध्ये ३ मे रोजी झालेली अंडरग्रेजुएट मेडिकल प्रवेश परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे १२ मे रोजी रद्द करण्यात आली होती. २१ जून रोजी ती पुन्हा घेतली जात आहे.
















