22.6 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबई अदानीला विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नव्हे : संजय राऊत

मुंबई अदानीला विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नव्हे : संजय राऊत

मराठी माणसासाठी काय केले सांगा, भाजपाचे संजय राऊतांना आव्हान

मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला असून प्रदेश भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना तुम्ही मराठी माणसाच्या हितासाठी काय केले? असा सवाल केला. राऊत हे मराठी माणसासाठी नाही तर पत्राचाळ घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले. राऊत यांनी आयुष्यात मराठी माणसाच्या भल्यासाठी केलेले एक तरी काम दाखवावे, आपण त्यांना हजार रुपये देऊ असे आव्हान बन यांनी दिले. तर याला प्रत्युत्तर देताना, गौतम अदानी यांना मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही, असा पलटवार केला.

मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. संजय राऊतांनी मराठी माणसांची घरे लुटली, भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतील मराठी माणसाला किफायतशीर किंमतीत घरे दिली, त्याच बीडीडी चाळीतील घरांची किंमत ठाकरे सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री असताना तब्बल ५० लाख इतकी केली आणि हे म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली १० कामे सांगावी. १० कामेच कशाला, १०० कामांची माहिती देतो. मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्ते, पायाभूत सुविधा, घरे ही आणि असंख्य कामे फडणवीस यांनी केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन केले.

फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि खुर्ची पटकावली. उद्धव यांच्या हीन कृत्यामुळेच मतदारांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांना मिळाला मुस्लीम मते मिळवण्यासाठी उबाठा गट ‘मुस्लिम लीग’सारखा पक्ष झाल्याची बोचरी टीकाही बन यांनी केली.

भीतीपोटी युती
ठाकरे बंधूंची युती ही पराभवाच्या भीतीतून निर्माण झालेली युती आहे असे बन यांनी नमूद केले. निवडणुका आल्या की मराठी माणूस, मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा बागुलबुवा निर्माण करण्याचे काम मनसे आणि उबाठा गट करतात असे टीकास्त्र बन यांनी सोडले. भाषिक, प्रांतीय वाद निर्माण करण्याची परंपरा ही उबाठा गट आणि मनसेची आहे. मनसेनेच अमराठी माणसांना मारहाण केली, भाषेच्या नावावर, प्रांतवादाच्या नावावर सर्वसामान्य मुंबईकरांना मारले. भाजपाने कधीही मराठी- अमराठी वाद निर्माण केला नाही. म्हणूनच मुंबईकर आणि मराठी माणूस भाजपा, महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.

संजय राऊतांचा पलटवार
उद्धव ठाकरेंमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, या भाजप नेत्यांच्या टिकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देत नाही, ही तुमची पोटदुखी आहे. पण गौतम अदानी यांना मुंबई विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नाही. मोदींच्या मित्राच्या घशात फुकटात मुंबई घालणे, ही मुंबई आणि मराठी माणसांची सेवा नाही. ठाकरे बंधू जर सत्तेसाठी एकत्र आले, तर मग तुम्ही एकमेकांची चम्पी मालिश करण्यासाठी एकत्र आलात का? असा सवाल राऊत यांनी केला. भारतीय जनता पक्षाने आणि किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केले? मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

गोपीनाथराव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्राविषयी बोलले नाही. बेळगाव-कारवार सीमाप्रश्नाच्या संदर्भात मराठी माणसावर होणा-या अन्यायाबाबत कोणत्याही भाजप नेत्यांनी आवाज उठवला नाही. अधिवेशनकाळात वेगळा विदर्भ करू, महाराष्ट्र तोडू असे बोलले गेले, त्यावर मुख्यमंत्री म्हणून उभे राहुन त्यांनी जाब विचारायला पाहिजे होता. ते त्यांचे कर्तव्य होते. पण ठाकरे उभे राहिले. ‘महाराष्ट्र कसा तोडताय बघू’ असे ते म्हणाले. पण मुख्यमंत्री उभे राहिले का आणि जाब विचारला का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

बाळासाहेब ठाकरे होते आणि ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावे लागले असते. सत्तेसाठी तुम्ही आमची मराठी माणसाची शिवसेना फोडलीत. मराठी माणसाची संघटना बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिली. हे तुमचे मराठी प्रेम, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR