धुळे : उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराने ग्रस्त होते. आज सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता धुळे शहरातील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर अन्त्यसंस्कार होणार आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापुरात आपल्या मुलीकडे गेले असताना त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे फुप्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने निदान झाले होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अलीकडे पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. तयांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.