Homeमहाराष्ट्रविदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे मोठ्या संख्येत चाहते होते. त्यांच्या निधनाचे वृत्त रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास आले अन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी आपल्या सौम्य, मृदूभाषेमुळे विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षात केली. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी वर्धा मतदार लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लोकसभेसह राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. ते ३ वेळा विधान परिषद सदस्यही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तेव्हापासून ते भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमच नव्हे तर सर्वच निवडणुकीतील रणनितीचा भाग होते. परंतु त्यापूर्वी ते १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोदच्या सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

अनेक वर्ष मंत्री, विरोधी पक्षनेता अशी पदे भूषवित १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR