नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक या आंदोलनात त्यांना साथ देत असून गेल्या १३ दिवसांपासून ते उपोषण करत आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी झालेल्या पावसामुळे टेन्ट लावण्यासाठी अभिजीत दिपके पोलिसांना हात जोडून, त्यांच्या पाया पडून, विनवणी करत असल्याचा व्हीडीओ त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन शेअर केला आहे. यापूर्वी त्यांचा व्हीडीओ हटवल्याचा दावा देखील त्यांनी केला.
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके करत आहेत. गेल्या २१ दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु आहे. गुरुवारी आंदोलनस्थळी झालेल्या पावसामुळे आंदोलनकर्त्यांवर पावसाच भिजण्याची वेळ आहे. यामुळे परिसरात टेन्ट उभारण्याची विनंती दिपके करत होते मात्र त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप दिपकेंनी केला आहे. वरिष्ठ अधिकारी टेन्ट उभारण्यासाठी परवानगी देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. अभिजीत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते पोलिस अधिका-यांना हात जोडून, पाय पडत टेन्ट उभारण्यासाठी विनंती करताना दिसत आहे.
















