नवी दिल्ली : नीट यूजी २०२६ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ची धडक कारवाई सुरू असतानाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीबीएसई निकालात मोठा फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे देशातील लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक मानसिक धक्क्यात असल्याचा दावा करत त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून परीक्षेवर चर्चा करणारे नेहमीप्रमाणेच याही वेळी मोदी सरकारकडे ना उत्तर आहे, ना जबाबदारी, ना लाज, अशा शब्दांत राहुल गांधींनी एक्सवरून संताप व्यक्त केला.
निकाल प्रक्रियेची जबाबदारी दिलेल्या कंपनीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या कोएम्ट कंपनीला हे कंत्राट देण्यात आले, ती कंपनी पूर्वी ग्लोबअरेना या नावाने कार्यरत होती. २०१९ मध्ये तेलंगणामध्येही या कंपनीने असाच कारभार केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच हा प्रकार म्हणजे केवळ एक चूक नसून, एक विचारपूर्वक रचलेला कट असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी म्हणाले, नाव बदलले पण नियत तीच, प्रवृत्ती तीच. इतिहास माहीत असूनही हे कंत्राट देण्यात आले.
अशा कंपनीच्या हाती १८.५ लाख मुलांचे भविष्य सोपवले गेले आणि कोणालाच काही फरक पडला नाही. ही चूक नाही, तर हा एक विचारपूर्वक रचलेला कट आहे. कोएम्ट कंपनीला सीबीएसईचे कंत्राट का आणि कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले? या कंपनीला कंत्राट देताना कोणकोणते नियम आणि प्रक्रिया डावलण्यात आल्या? ही कंपनी पूर्वी ग्लोबरेन नावाने वादात सापडली होती, तर मग उइरए ला हे का माहीत नव्हते? कंपनीची पार्श्वभूमी का तपासली गेली नाही? व्यवस्थापन आणि मोदी सरकार यांच्यात नेमके काय संबंध आहेत? असा चार तिखट प्रश्नही राहुल गांधी यांनी सरकारला विचारले.
न्यायालयीन चौकशीची मागणी
हा संपूर्ण प्रकार म्हणजे एक मोठा घोटाळा असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आणि ख-या दोषींना समोर आणण्यासाठी तातडीने स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली आहे.
















