जालना : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले असून २ सप्टेंबर रोजी शासनाने काढलेल्या जीआरविरोधात ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नागपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा होत असून या मोर्चासंदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर टीका केली. तसेच, आपण सापला दूध पाजले ह्याचा पश्चाताप शरद पवारांना होत असेल, असेही जरांगे यांनी म्हटले.
नागपूरमधील ओबीसींचा मोर्चा राजकीय आहे, राजकीय स्वार्थासाठी तो काँग्रेस पक्षाचा मोर्चा आहे, हा मोर्चा ओबीसींसाठी नाही आणि ओबीसी कल्याणासाठी नाही, असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले. आता, त्यावर विजय वडेट्टीवारांनी पलटवार केला आहे. जरांगे यांनी ओबीसी मोर्चासंदर्भात वक्तव्य केल्यानंतर शरद पवार यांच्यावरही टीका केली. तसेच, पवार यांच्यावर केलेल्या आम्ही अगोदर शरद पवार साहेबांवर का बोललो? त्यांचा तो देशमुख माणूस का बोलला.? १९९४ च्या जीआर वरून शरद पवारांना आज पश्चाताप वाटत असेल.
९४ ला झाले ते झाले, जो देव्हारा व्हायचा तो झाला. पण, ओबीसींना पवार साहेबांनी १६ टक्के आरक्षण दिले. ते आमचे आरक्षण होते, ते लोक त्यांच्याकडून राहायला पाहिजे होते, शरद पवार हे सापाला दूध पाजून बसले, त्यांना पश्चाताप होत असेल. कारण, ज्यांना आरक्षण दिले ते आपल्या बाजूने राहिले नाहीत, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला.
मी शरद पवार यांच्यावर बोललो, मी टीका केली नसून फक्त फरक सांगितला. देशमुखसारख्या नेत्यामुळे त्यांच्या नेत्यांना डाग लागतो. विविध राजकीय पक्षांचा ओबीसींना खेचण्यासाठी प्रयोग सुरू आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यातच स्पर्धा लागलीय, असेही जरांगे यांनी म्हटले. तसेच, कसला पिक्चर यांच्या डोक्यात फक्त राजकारणाचा किडा आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवारांवर टीका केली. तर, एवढे समाजासाठी लढले असते तर धनगरांना आरक्षण मिळाले असते म्हणत लक्ष्मण हाकेंना टोला लगावला. तसेच, मागासवर्गीय आयोगाचे निकष पूर्ण न करता तुम्ही बोगस आरक्षण घेत आहात, असेही जरांगे यांनी म्हटले.
जरांगेंच्या बुडाला आग लागली : वडेट्टीवार
मनोज जरांगेना अक्कल नाही, मोर्चामुळे जरांगेच्या बुडाला आग लागली आहे. जरांगेला हा मोर्चा राजकीय स्वार्थासाठी काढलेला दिसतोय. या मोर्चामध्ये कुठलाही राजकीय बॅनर नाही. कुणाचेही फोटो नाहीत, लोक उत्स्फूर्तपणे आले आहेत. तरी जरांगे वैफल्यग्रस्त होऊन असा आरोप करत आहे, असा पलटवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. ज्या जीआरला जरांगे आपला विजय म्हणतात, तोच जीआर रद्द करण्याची मागणी लाखोंच्या संख्येने ओबीसी करत आहेत, म्हणून जरांगेंच्या बुडाला आग लागली आहे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

