पुणे : प्रतिनिधी
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने चेअरमन फोडून पॅनल उभे केले. भविष्यात भाजपपासून असणारा धोका ओळखून अजितदादांच्या पक्षातील सहका-यांनी आताच सावध व्हावे. जर खरोखरच अजितदादांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार करत शरद पवार पक्षात परत येण्याचे आवाहन केले आहे.
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संयुक्त प्रचार मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपातील अंतर्गत मतभेद, उसाचा दर, दुष्काळातील शासकीय अनास्था, कंत्राटदारांची थकबाकी आणि सोमेश्वर कारखान्यातील निकालावर पक्षाची सविस्तर व परखड भूमिका मांडली.
पुणे पदवीधर मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिल्यानंतर आघाडीत समन्वय नसल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना आमदार शिंदे म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघावरून महाविकास आघाडीत संजय राऊतांच्या उपस्थितीत दोन ते तीन बैठका झाल्या होत्या. दोन जागा एका पक्षाला, दोन दुस-याला आणि एक तिस-याला, असा ‘दोन-दोन-एक’चा फॉर्म्युला चर्चेत होता. मात्र, अंतिम क्षणी एकमत होऊ शकले नाही. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच पुण्यातही ही लढत ‘मैत्रीपूर्ण’ होत आहे.
हर्षदा जाधव आणि जयंत आसगावकर रिंगणात
आम्ही पदवीधरसाठी उच्चशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार हर्षदा जाधव यांना, तर शिक्षकसाठी माजी आमदार जयंत आसगावकर यांना मैदानात उतरवले आहे. मतदार सुशिक्षित आणि सुज्ञ आहेत. शेवटी भाजप आणि महायुतीच्या उमेदवाराला कोण पराभूत करू शकते, हे पाहून मतदार योग्य निर्णय घेईल. आवश्यक भासल्यास शेवटच्या क्षणी आघाडीचे नेते एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घेतील.
सतेज पाटील यांच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुका परवा असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, हर्षवर्धन सकपाळ हे सर्वजण प्रचारात सक्रिय असून महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने एकत्र उभी आहे.
युगेंद्र पवारांचे पाऊल कौतुकास्पद!
सोमेश्वर कारखान्यातील पराभवावरून होणा-या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकमताने व्हावी असा प्रयत्न होता; मात्र तसे न झाल्याने कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी युगेंद्र पवार यांनी पॅनल उभे केले. नगरपालिकेनंतर आता सहकारात कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही सुरुवात आहे. प्रत्येक निवडणुकीत लगेच यश मिळतेच असे नाही; पण प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांसाठी लढणे कौतुकास्पद आहे. या संघर्षाचे फळ भविष्यात नक्की दिसेल.
















