ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना एका आठवड्यापूर्वी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात एक मोठे विद्यार्थी आंदोलन झाले होते, याच आंदोलनादरम्यान शेकडो जण मृत्युमुखी पडले होते. या आंदोलनाच्या पाठिमागे शेख हसीना या मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणाची जवळपास एक वर्षभर न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी अखेर इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनलने निर्णय देत शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली.
त्यानंतर आता शेख हसीना यांना बांगलादेशातील एका न्यायालयाने गुरुवारी कथित तीन भ्रष्टाचाराच्या प्रकरणात २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. एका आठवड्यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर आता दुस-या एका प्रकरणात २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यामुळे शेख हसीना यांच्यासाठी हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. या संदर्भातील वृत्त बांगलादेशातील माध्यमांच्या हवाल्याने दिले आहे.
शेख हसीना यांना तीन वेगवेगळया भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये ही २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. बांगलादेशातील पूर्वाचल शहरातील एका टाउन प्रोजेक्टमध्ये भूखंड वाटपात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच संबंधित तीन भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत न्यायालयाने शेख हसीना यांना एकूण २१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, म्हणजे तिन्ही प्रकरणांमध्ये प्रत्येकी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

