24 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeमहाराष्ट्रमहापौर पदासाठी शिंदेंना दिल्लीतून पाठबळ

महापौर पदासाठी शिंदेंना दिल्लीतून पाठबळ

संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे गटात फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना फोडल्यामुळे अमित शहा त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. कुणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहे. अन्यथा २९ नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का? भाजप किंवा देवेन्द्र्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये म्हणून दिल्लीतून शिंदेंना चावी देणारा कोण?, असा सवाल शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाला चार दिवस झाले तरी मुंबईत महापौर कोणाचा होणार हे स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले नवनिर्वाचित नगरसेवक फुटू नये यासाठी यासर्वांना पंचतारांकित हॉटेलात ठेवले आहे. यापार्श्वभूमिवर बोलताना संजय राऊत यांनी, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईत शिंदे गटाचा महापौर होणार नाही, असा दावा केला. आमच्या शिवसेनेचे नगरसेवक आपापल्या घरी असून त्यांची बैठक मातोश्रीवरच होत आहेत. पण मिंधे गटाला त्यांचे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये डांबून का ठेवावे लागले? याचे उत्तर द्यावे.

भाजपचा महापौर होऊ नये म्हणून त्यांचा सहकारी पक्ष देव पाण्यात घालून बसला आहे. आता त्या दोघांमध्ये काय होते त्याचा आधी निकाल लागू द्या, मग आम्ही आमचे देव बाहेर काढू. टायगर अभी जिंदा है… असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले. शिवसेना आणि आमच्या सहकारी पक्षांजवळ सत्ताधा-यांना चॅलेंज करू शकेल एवढा आकडा आहे. सध्या आम्ही फक्त मजा पाहत आहोत असेही राऊत म्हणाले.

भाजपचा महापौर झाल्यास मुंबई शोकसागरात बुडेल
मुंबईला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची परंपरा आहे. भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल, अशी टिका राऊत यांनी केली. मोरारजी देसाई यांनी १०६ लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच असेल, असेही ते म्हणाले.

मुंबईत कोणाला बसवायचे अदानी ठरविणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या भाषणात मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, मुंबईत कुणाला बसवायचे हे दिल्लीत ठरलेले आहे. भाजपच नाही तर गौतम अदानीही ठरवणार आहे की मुंबईत कुणाला बसवायचे, असा टोला लगावत ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत ते पाहता कुणालाही सहजतेने महापौर बसवणे सोपे नाही. भाजप कितीही मोठा विजयोत्सव करत असला तरी त्यांचा विजय झालेला नाही, असेही राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR